संपन्न महाराष्ट्र
संपन्न महाराष्ट्र


सह्याद्रीतील सह्यकड्यांचे मराठमोळे वीर ,
देशरक्षणा प्राणपणाने तळहातावर शीर .
बाळकडू मातेने दिधले शूर वीरतेचे
बेडर , निधडी छाती करते , निर्दालन शत्रूंचे (1)
शूर शिवाजी अन् छाव्याची परंपरा योद्धयांची ,
पेशवाईची , रामशास्त्रींची कर्तबगारी साची .
टिळक , गोखले , सावरकर नी बाबू गेनू थोर
भारतमाता मुक्त कराया सोडियले संसार . (2)
भूमी आमुची मराठमोळी , संगीतकलासक्त
आशा नि लता अन ग. दि. मा. ,
रविवर्मा भक्त .
अभंगातही थोर साधना ज्ञाना , तुकयांची ,
एकनाथी भारुडे नि आर्या मयूरपंतांची . (3)
फाळके , भालजीं हस्ते , सिनेदालन खुले .
शाहिरीत साबळे , उमपांचा सूर टीपेला चढे .
नाट्यदर्पणी गंधर्वांचा अभिनय शोभतसे .
व्हायोलिनचा सूर जोगांचा रसिकमना भिडतसे . (4)
लोकधारा महाराष्ट्राची लावणी , गण , गौळण ,
लोकनाट्य नि कथा , गजाली ,
कर्णमधुर कीर्तन .
वारक-यांची परंपरा ही , भक्तिमार्गास लाभली ,
पंढरीच्या विठूरायापायी भावभक्ती
लोटली . ( 5)
साहित्यगंध दरवळे येथला अवघ्या विश्वात .
बहिणाबाई , शांताबाई ,पु . ल .
वा रा कांत .
स्त्रियाही प्रगतीपथावर , राष्ट्रपतीपद भूषविले
फुले नि कर्वे दांपत्यांनी ज्ञानामृत दिधले . (6)
मराठमोळे पाऊल पुढे कुस्ती , कबड्डीमधी
गावसकर , तेंडुलकर गाजले अवघ्या विश्वामधी .
जलतरण , नेमबाजीमधी महिला यश मिळविती ,
क्रिकेट , गिर्यारोहणामधी त्यांना दिगंत कीर्ती . (7)
शेती हाच बाणा ठेवुनी बळीराजा राबतसे ,
नवनवीन तंत्रज्ञानाने प्रगतीशील होतसे ,
खाद्यसंस्कृती विपुल इथली परदेशी संतुष्ट ,
पुरणपोळी नि मोदकांकडे होती आकृष्ट . (8)
थोर , धुरंधर सेनानी स्वातंत्र्यलढा लढले
आगरकर , अत्र्यांनी पेटते टीकास्त्र सोडले .
तैलबुद्धीचे महाराष्ट्रीय नाठाळांस असे काठी ,
हेकट तसेच मधुरही भल्यांस देती लंगोटी . (9)
विज्ञानातही पाऊल पुढचे नारळीकर , माशेलकरांचे
सावरकर नि आंबेडकर हे हिरेच शिरपेचाचे .
प्रगतीशील महाराष्ट्र तंत्रज्ञानातही अग्रेसर ,
गर्जतो कीर्तीचा डंका परदेशी दूरवर . (10)
पुनीत भूमीत जन्म लाभणे पूर्वसंचित आपुले ,
पुनर्जन्मही माय मराठीत , परमेशा प्रार्थिले .
महाराष्ट्राची महती माझ्या असे शब्दातीत ,
अल्पमती मी केला यत्न काव्यबंधनात . (11)