पर्जन्य
पर्जन्य


सुधाकरी अभंग
*पर्जन्य*
भेगाळली भुई । तहानली धरा ।
आटलाय झरा । नदीपात्रे ।।
बळीराजा तुला । नित्य आळवितो ।
कधी बरसतो । वाट पाहे ।।
निर्जल प्रदेशी । मृग कोसळला ।
बळी सज्ज झाला । पेरणीला ।।
तव आगमने । शुभ्र जलधारा ।
सोसाट्याचा वारा । संचारती ।।
अति पर्जन्याने । गावोगावी पाणी ।
वाहे ओसंडूनी । अतोनात ।।
बेताने येवोनी । झरे, नदी भर ।
नको तो कहर । जीवघेना ।।
धरा वसुंधरा । न्हाऊन निघाली ।
पाने तरुवेली । बहरली ।।
नभ झाकोळले । ढग उतरले ।
इंद्रधनू आले । भेटायासी ।।
पर्जन्य राजाने । संजीवन दिले ।
बीज अंकुरले । शिवारात ।।
अवनी सजली । सुजलां सुफलां ।
धरणी शितलां । तृप्त होई ।।
झिम्माड पाऊस । खळाळ ओहोळ ।
जल हे नितळ । सुखावती ।।