पावसा चल शेतात
पावसा चल शेतात
तिफन घेऊन शेतकरी पेरणीच्या बेतात ।
इथे तिथे रेंगाणाऱ्या पावसा चल शेतात।।धृ।।
तू हळूहळू येशील सारं रान कवेत घेशील ।
लहरीपणाला सोडून नियमीत भेट देशील ।।
तुझ्या नावाने लोक माझी फिरकी घेतात।
इथे तिथे रेंगाणाऱ्या पावसा चल शेतात।।१।।
कष्टाचं माझ्या चीज, शेतात तुझा नाच।
काया मातीची भरते, ऊललेली खाच-खाच।।
आल्या सरीवर सरी परम आणंद देतात।
इथे तिथे रेंगाणाऱ्या पावसा चल शेतात।।२।।
तूझे येणे देते सुख, रुसने तुझे देई दुःख ।
भुमीच्या लेकराचं वरून पाहत जा तू मुख।।
तूझ्या येन्याच्या आशेने पाय शेतात नेतात।
इथे तिथे रेंगाळणाऱ्या पावसा चल शेतात।।३।।
पावसा तू पाखरू, तू नभाचं लेकरू।
मी धरणीचा लेक, चल सणाले साकारू।।
पोरी माहेरास येती तश्या सरी वाटतात।
इथे तिथे रेंगाणाऱ्या पावसा चल शेतात।।४।।
