मन खोलत जायाचं
मन खोलत जायाचं
दुःख असते मनात
ते बोलत जायाचं।
मायी कविता म्हणते
मन खोलत जायाचं।।धृ।।
शब्द झालेत महाग
ओठ तेही उमलेना।
भल्या बोलाचा दुष्काळ
बाग प्रेमाची फुलेना।।
भावनेच्या तराजूत
शब्द तोलत जायाचं।।१।।
काळ गेला तो बोलाचा
बोलाच्या मोलाचा।
गेली किंमत नात्याची
भाऊ भावाच्या तोलाचा।।
घराघरात कुरुक्षेत्र
महाभारत बह्याळ्यांचं।।२।।
नातू कार्टून पायतात
गोष्टी आजीच्या हरवल्या।
काय आबाची माया होती
नाता खांद्यावर मिरवल्या।।
आठवणींची साखर
मनी घोळत राह्याचं।।३।।
कवि-ईश्वर अनुयायी
शब्दजालात धसलेला।
एक नंदादीप तेवता
शब्द हृदयात वसलेला।।
पाखंडाला डसणारा
शब्द शस्र करायाचं।।४।।
