निसर्ग
निसर्ग


आपल्या आजूबाजूला दिसतो तो सगळा निसर्ग,
झाडं, डोंगर, नद्या, आकाश आणि पाण्याचा विसर्ग
वेगवेगळे पक्षी, निरनिराळे प्राणी,
सगळे गातात आनंदाने निसर्गाची गाणी
पडतो पाऊस, पिकते शेती, तृप्त होते धरणी
बहरतात झाडं, विहरतात पक्षी, निसर्गाची करणी
प्रकाशतो सूर्य, दिसतं इंद्रधनु, कधी कडाडतात विजा,
फुलपाखरांना, रंगीबेरंगी फुलांना बघण्याची औरच मजा
निसर्गानं माणसाला बहाल केली अफाट बुद्धी आणि हसण्याची कला,
इतर प्राण्यांसारखं त्यानंही राहावं गुण्यागोविदानं, वाटतं निसर्गाला
माणूस त्याचाच भाग, निसर्गानं त्याला काय नाही दिलं?
विचार करावा त्यानं निसर्गाच्या निसर्गत्वाचं आपल्यामुळं काय नुकसान झालं?
हाच निसर्ग कोपतो कधीकधी होऊन भूकंप, पूर आणि ज्वालामुखी,
असं सारखंसारखं घडल्यावर कशी राहील सृष्टी सुखी?
सरतेशेवटी काय, माणसाला निसर्गाच्या पुढं जाता येत नाही
जितका करतो निसर्ग, माणसानंही करावा त्याचा विचार तितकाच काही!