मन
मन


खरंच मन वेडं असतं किती समजावं त्याला
काय कुणाच्या मनात असते नाही कळत कुणाला
कुणा ना कळले कसा घालावा मनास या आवर
सापडले न मर्म मनाचे, चंचल मन हे फार
कळले का कुणास कधी भेद खरे या मनाचे?
विचारा तुम्ही मनास तुमच्या सारे कळतील रंग त्याचे
मनात एक अन् जनात एक हा डाव मनाचा न्यारा
मनमानी ही चाले मनाचीच मोठा मनाचा पसारा
मन माझे हे मला न कळले, कळले नाही कुणाला
मनात चाले गुंता मनाचा ठाऊक तेही मनाला
मन कुठे, कधी नि कसे, काय ते सारेच मन जाणे
मनालाच ठाऊक कुणाची कधी जुळतील कशी मने
शोधून तरी ते सापडेल का मन मनांत नसताना
मुळीच नसतो भरोसा मनाचा मी रडतोय हसताना...