बहर
बहर


मन मनास उमजत नाही आधार कसा शोधावा,
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा
ती वाट दूर वळणाची मग साद मना घालावी,
ती पर्णगळीत निस्तेज फुले पुन्हा पल्लवीत व्हावी
त्या विरल्या क्षणांना मग स्पर्श पुन्हा लाभावा,
त्या दुभंगल्या स्वप्नांना नवा अर्थ गवसावा
त्या हरवल्या गीताला नवे सूर लाभावे,
त्या अंधुक, धूसर किरणांना पुन्हा धुमारे यावे
अंधारल्या भावनांना तेजोवलय मिळावे,
त्या स्थिर, निश्चल जलावर पुन्हा तरंग उठावे
शुभ्र, नितळ नभावर इंद्रधनु उमटावे,
रूक्ष, उजाड धरणीने पुन्हा नवेपण ल्यावे
त्या दिशाहीन गलबताला पुन्हा किनारा भेटावा
त्या निशेच्या उदरातून सूर्यबिंब जन्मावा
अलगद सृष्टीकर्त्याचे कल्पित गुढ उकलावे,
अवगत मनुजजन्माचे नवे पर्व बहरावे!!