भिकारी
भिकारी


भीक मागतो मी पण मला क्षण-क्षण आठवतो
जग मात्र म्हणतं मी फुकटचं खातो
तिरस्काराच्या भावनेने वागवतं जग मला
भीक मागणं हीच माझ्या जगण्याची कला
भाकरीच्या बदल्यात प्रत्येकाला आशीर्वाद देतो
जग मात्र म्हणतं मी फुकटचं खातो
नोकरीला होतो तेव्हा मान होता मोठा
झाला माझा अपघात अन् आयुष्याचा तोटा
काळच माणसाला कुठल्याकुठे नेतो
जग मात्र म्हणतं मी फुकटचं खातो
घरच्यांनी दिली नाही साथ सगळे करायचे अपमान
मातीमोल झालं सगळं, स्वप्नांची धूळधाण
आता फक्त स्वतःला स्वतःच्याच कवेत घेतो
जग मात्र म्हणतं मी फुकटचं खातो
आज मंदिराच्या पायरीवर बसलोय जरा निवांत
शून्यात आहे नजर मला ना कसलीच खंत
पदोपदी देव बरोबर असल्याचा साक्षात्कार होतो
जग मात्र म्हणतं मी फुकटचं खातो