आई
आई


प्रेमळ माऊली / बाळा जन्म देई
संगोपन होई / प्रेमभावे (1)
खेळताना बाळ / पाही संतोषाने
चालणे बोलणे / शिकविते (2)
अक्षरे शिकवी / खेळकरपणे
स्तोत्र पाठ म्हणे / संध्याकाळी (3)
गोष्टी छान छान / रंगवून सांगे
बाळ त्यात रंगे / आनंदेचि (4)
कडक शिस्तीचे / वळण लावते
संस्कार करते / अनमोल (5)
आईची महती / काय ती वर्णावी
शिवाजी घडवी / जिजाबाई (6)
रात्र पडताच / कुशीत घेतसे
वात्सल्य देतसे / भिती पळे (7)
नाटक वक्तृत्व / खेळ संगीताची
गोडी लेकराची / जपतसे (8)
अवघे जीवन / बाळा समर्पण
जडणघडण / आदर्शचि (9)
जीवनसागरी / माय दिपस्तंभ
मार्गास सुलभ / दिशा देई (10)
पूर्वसंचिताने / आम्ही भाग्यवान
सद्गुणी खाण / माय लाभे (11)