आई
आई


आई तुझी आठवण, येते क्षणोक्षणी
अनावर होते दुःख, डोळ्यात पाणी।।धृ।।
गेलीस कशी आई, सोडून तू मला,
कुठे पाहू सांग मी, कुठे शोधू तुला?
घेईल कोण पोटाशी मज, सांग तुझ्यावाणी...।।१।।
कसं आवरु दुःख मी, तुला कसं विसरु,
गेलीस तू झालं तुझं, पोरकं गं लेकर,
झोप येईना डोळ्याला, उघडीच पापणी...।।२।।
तुझ्या लेकराला आई, गेलीस तू सोडून,
जीव माझा झाला वेडा, रडून, रडून,
नको अन्नाचा घास, जाईना गं पाणी...।।३।।
माझ्यावर दुःखाचा कोसळला हा डोंगर,
आई तुझा बाळाला या, पडेना गं विसर,
कोसळले आकाश, फाटली गं धरणी...।।४।।
का रे देवा तुला माझी, दया नाही आली,
आम्हा माय लेकरांची ताटातुट तू केली,
ये गं आई माझ्यासाठी ये गं तू धाऊनी...।।५।।
दिनरात झुरतो आई, आई मी तुझ्यासाठी,
करतो नवस मी देवाला, दे जन्म तुझ्यापोटी,
पूनर्जन्म घेऊ दोघं, नऊ महिन्यांनी...।।६।।