STORYMIRROR

Ajit K

Tragedy

3  

Ajit K

Tragedy

हरवलेल्या माणुसकीचा बळी

हरवलेल्या माणुसकीचा बळी

6 mins
235

काय रे ! मला सोडून, तिला पटवायचा विचार आहे की काय तुझा. बिनधास्त बोलणारी अस्मिता, माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाली.

मी आणि माझी मैत्रीण म्हणजे अस्मिता, सकाळच्या ७.२१ च्या फास्ट गाडीने डोंबिवली ते मुंबई असा प्रवास करत असतो. मी लेडीज फर्स्ट क्लास चा मागचा डबा आणि अस्मिता लेडीज फर्स्ट क्लास डब्यात असते. त्याच डब्यात ती, मुलगी पण चढते. नेमकी माझ्या समोरच रेलिंगला उभी राहून, तिचे हे चॅटिंग घाटकोपर पर्यंत चालू असते.

अग ! तिला पटविण्यासाठी मी तुला तिची माहिती काढ म्हणून सांगत नाहीये. 

मग !

एक उत्सुकता म्हणून विचारतोय.

मी रोज बघतो, ठाण्याच्या पुढे जागा मिळाली तरी, ती तिथेच त्याच रेलिंगला टेकून फोनवर चॅटिंग करत असते. मधेच हसते, तोंड वेंगाडुन, जीभ बाहेर काढते, आणि परत टाइपिंग करायला लागते. 

मग अस्मिताने तिची ओळख करून घेतली, हळूहळू तिची माहिती काढली आणि मला सांगितली.

तिचे नांव रोहिणी होते.

तिचे लग्न ठरले होते. मुलगा चांगल्या हुद्यावर, चांगल्या पगारावर नोकरीला होता. मुंबईत टू बीएचके चा प्रशस्त फ्लॅट होता. एकंदर चांगले स्थळ मिळाले होते. खुशीत होती ती खूप.

घरात एकुलती एक, त्यामुळे लाडात वाढलेली. खाऊन पिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील होती.

कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन, एमबीए केलेले. एका चांगल्या एमनसी कंपनीत नोकरीला होती. घाटकोपरला उतरून मग परत मेट्रो पकडायची. तिथेच बाजूच्या कंपनीतील एका तरुणाशी ओळख होऊन, प्रथम मैत्री नंतर प्रेमात आणि आता त्याचे लग्नात रूपांतर होत होते.

अस्मिता मुळे तिची आणि माझी जुजबी ओळख झाली, हाय ! हॅलो ! गुड मॉर्निंग !! एवढीच. 

प्लॅटफॉर्म वर आलो की मी अस्मिताला लेडीज डब्यापाशी सोडून, तिला गुड मॉर्निंग करून, जेन्ट्स डब्याजवळ जायचो

ती गोरीपान, साधारण २८-२९ ची असेल. नेहमी पंजाबी ड्रेस आणि शनिवारी मात्र जीन्स आणि टी शर्ट मध्ये यायची.

हनुवटीवर उजव्या बाजूला, एक छोटासा काळा तीळ, तिचे सौंदर्य अजून वाढवीत होता.

गाडी येई पर्यंत, ती मोबाईल वर बोलत असायची. गाडी आली की पटकन, मोबाईल, पर्स सांभाळत, एखाद्या खारीच्या चपळाई ने ती गाडीत शिरायची. ठाण्याला गर्दी उतरली की, त्या नेहमीच्या रेलिंगला टेकून मग मोबाईल काढणार आणि चॅटिंग चालू करणार हा तिचा नेहमीचा शिरस्ता मला माहिती झाला होता. मी सुद्धा तो पर्यंत, माझ्या जागेवर पोचत असे. 

लेडीज डब्यात ती आणि जेन्ट्स डब्यात मी. त्या गर्दीत सुद्धा मी तिला बघत राहायचो.

हळूहळू गर्दी कमी होत गेली, की मला स्पष्ट दिसायची.

कपाळावर येणारी एक लडिवाळ बट. आलेले चॅट मेसेज वाचता वाचता, तर्जनीने त्या बटेशी खेळत, तिला पीळ देत राहण्याची तिची अदा तर, दिल खुश करून जायची.

तिच्या चेहऱ्यावरचे भाव फारच बोलके असतात. मी तिच्या भावविश्वात गुंतत होतो. माझ्या समोरच पलिकडच्या डब्यात ती उभी असल्याने तिचे सर्व विभ्रम, चेहऱ्यावरचे भाव मी आता समजून घेऊ शकत होतो.

मधेच हसायची, डोळे मोठे करायची, थोडी वाकुल्या दाखविल्या सारखी जीभ बाहेर काढायची. सर्वच विभ्रम विलोभनीय होते.

मी आता हळूहळू तिच्या विभ्रमा वरून, तिचे मन, तिचे शब्द वाचायला शिकलो.

ती खुदकन हसली की, मी समजायचो, तिच्या होणाऱ्या नवऱ्याने काहीतरी विनोद केला असणार. डोळे मोठे करून मग हसली की, काहीतरी चावट पण आवडेल असा बोलला असणार. लगेच "चल चावटपणा बास झाला" असे टाइप करीत असणार.

कपाळाला आठ्या पडल्या की, "असे काय बोलतोस" किंवा "असे काही नाही रे" असे टाइप करणार.

एकंदर खूप सुखी होती. चांगले शिक्षण, नोकरी आणि आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न अजून सुख म्हणजे काय असते.

पण हेच सुख नियतीला बघवले नाही. नियती पण एखाद्या बेसावध क्षणी तुमच्यावर जीवघेणा वार करते.

होणाऱ्या नवऱ्याचा फोटो आम्हाला दाखवला. स्मार्ट होता मुलगा. अगदी तिला शोभेलसा.

चार दिवस साखरपुड्या साठी सुट्टी घेऊन, साखरपुडा करून, आज परत ती कामावर हजर होणार होती. आम्हाला दाखवायला, मुद्दामून साखरपुड्याची साडी नेसणार होती, अंगठी दाखविणार होती, पेढे पण देणार होती.

मी आणि अस्मिता आज जरा लवकर येऊन, तिची स्टेशनवर वाट बघत होतो. पण गाडीची वेळ झाली तरी ती अजून आली नव्हती.

गाडीने प्लॅटफॉर्म मध्ये एन्ट्री घेतली होती, पण तिचा पत्ता नव्हता.

गाडीचा डबा आमच्या जवळ आला. अस्मिता गाडीत चढली. तिला बघण्यासाठी मी थोडासा रेंगाळलो. तेवढ्यात ती जिन्यावरून धावत येताना दिसली. गुलाबी साडी, आणि तसाच स्लीवलेस ब्लाउज. खूपच सुंदर दिसत होती. तिने मला हाय केल्या सारखा ओळखीचा हात केला आणि धावतच गाडी पकडली. पण गर्दीमुळे पूर्ण आत जाऊ शकली नाही. दरवाज्याला बाहेर लटकत उभी राहिली.

तिला गाडी पकडलेली बघून, मी सुद्धा गाडी पकडली. खांबाला धरून उभा राहिलो. 

तिच्या लटकण्याची काळजी वाटून, तिला हाक मारून आत जा म्हणून सांगितले. तिला ऐकू आले की नाही कुणास ठाऊक.

गाडीने आता वेग घेतला होता, कोपर सोडले आणि ...

आतल्या माणसाला मी थोडा सरक म्हणून सांगण्यासाठी आत तोंड वळविले तोच.

तोच ...

एक हृदयद्रावक किंकाळी मला ऐकू आली, मी झटकन बाहेर पाहिले आणि एक गुलाबी पदर, माझ्या डोळ्यासमोरून गेला. मनात आलेली जीवघेणी शंका खरी ठरली होती.

दरवाज्याला पकडून, जेमतेम एका पायावर उभी असलेली ती, आतून आलेले गर्दीचे प्रेशर सहन करू शकली नाही. पाय फूटबोर्डा वरून निसटला, हात सुटला आणि ती बाहेर फेकली गेली.

कोणीतरी चेन ओढली, तशी गाडी बरीच पुढे जाऊन थांबली. 

मी पण खाली उडी मारली, आणि मागे धावत सुटलो.

वेडीवाकडी पडली होती ती. एका दगडावर आपटून, तिचे डोके फुटले होते. डोक्याखाली रक्ताचे थारोळे जमले होते. गुलाबी ब्लाउज रक्ताने लाल झाला होता. आचके देत शरीर उडत होते. पण प्राण जात नव्हता. जणू कोणाची तरी वाट बघत होती. तिला मदत करायची सोडून, कोण व्हिडीओ काढत होते, कोण फोटो काढत होते.

खाली जमिनीवर जिवंत व्यक्ती आचके देत होती. आणि माणुसकी मेलेली काही माणसे फोटो काढत होते.

अभावीत पणे मी झटकन पुढे झालो. 

तिचा हात हातात घेतला. आणि कोणीतरी पुढे केलेले पाणी तिला पाजण्यासाठी तिला थोडी वर उचलली.

माझ्या हाताचा स्पर्श होताच क्षणी, तिने कष्टाने डोळे उघडले, एक ओळखीचे हसू, तिच्या रक्ताने माखलेल्या ओठांवर आले. 

दिलेले पाणी पिण्यासाठी ओठ थोडे विलग करण्याचा प्रयत्न केला. थोडं पाणी तिच्या ओठांवर सोडले. एक घोट तिने कसाबसा गिळला. मोठ्या कष्टाने तिने आपला हात वर केला आणि मला तिच्या बोटातील रक्ताने माखलेली साखरपुड्याची अंगठी दाखविली, साडी कडे बोट केले. डोळ्यातून दोन अश्रू ओघळून, तिच्याच रक्तात मिसळले आणि माझ्या हातावरची तिची पकड सैल झाल्याचे मला जाणविले. पुढचा घोट पाणी पिऊ न शकल्याने, ओठांवर पडलेले पाणी तोंडात आत न जाता तसेच बाहेर ओघळले. 

आम्हाला अंगठी आणि साडी दाखविण्याची तिची इच्छा पूर्ण झाली. आणि तिने माझ्याच हातात शेवटचा श्वास घेतला. बाजूला आम्हाला आणि ऑफिस मध्ये देण्यासाठी आणलेला पेढ्याचा बॉक्स फुटून, त्यातील पेढे विखरून तिच्याच रक्तात माखले होते.

मी तिला अलगत खाली ठेवून, तसाच अस्मिता ला फोन लावून घडलेलं सांगितले.

तिच्या चेहऱ्यावर कडे मी बघितले. वेगवेगळे विभ्रम दाखविणारे तिचे डोळे आता निष्प्राण झाले होते. त्याच्या जोक्सला वेडावून दाखविणारी तिची जीभ मृत्यूच्या जबड्यात कायमची बंद झाली होती. आता ती कोणालाही वाकुल्या दाखवू शकणार नव्हती. तिचे बंद झालेले ओठ आता कोणालाही आय लव्ह यु म्हणणार नव्हते.

डोळे मिटून माणूस स्वप्ने बघतो, पण इथे डोळेच मिटल्याने सर्व स्वप्नेच उध्वस्त झाली होती.

तिची सर्व स्वप्ने हरवलेल्या माणुसकी मुळे पूर्ण व्हायच्या आधीच तुटली होती. 

काही स्त्रिया हळहळ व्यक्त करत होत्या. पण आता हळहळ व्यक्त करण्या मुळे गेलेली रोहिणी परत येऊ शकणार नव्हती.

Sorry never give a life to dead person.

गाडीत आत डब्यामध्ये एकाला सहज सामावून घेण्याऐवढी जागा असते. पण आत स्वतःला त्रास झाला नाही पाहिजे, असे उभे राहणार. त्यातून आता तर सात महिन्याच्या गर्भार स्त्री सारखे, छातीवर लावलेली ती बॅग. ती बॅगच एका माणसाची जागा अडवेल एवढी मोठी असते. कोण कोणाला बोलणार.

काही मित्र-मंडळी डब्यातील अर्धा दरवाजा अडवून उभी असतात. फक्त आपल्या मित्रांना तिथून आत यायची परमिशन. बाकीच्यांनी धक्के खात दरवाजाच्या उरलेल्या अर्ध्या भागातून कसेबसे आत शिरायचे. आत सुद्धा, त्या साईडला येणाऱ्या स्टेशनला उतरणार म्हणून आत जाणार नाहीत. त्यामुळे बाहेरून आत येणाऱ्याला आत जायचे म्हटले तरी जाता येत नाही. जेमतेम ५-६ माणसे चढू शकतात. मग काही जण नको असताना जबरदस्तीने दरवाज्यात जीव मुठीत धरून लटकत रहातात. आणि ही स्थिती प्रत्येक गाडीला. गर्दी म्हणून, आत जाता येत नाही म्हणून किती गाड्या सोडणार. कारण कामावर वेळेत पोहचण्याचे टेन्शन असतेच. 

मला एक समजत नाही, आपत्तीच्या काळात, एकमेकांना मदत करणारी माणुसकी, अशावेळी कुठे जाते. आपल्या सारखा एक पुरुष किंवा एक स्त्री, दारात लटकत आहे. थोडे आत सरकून, जागा दिली, किमान आतील कोणी अशा लटकणाऱ्यानां धरून ठेवले तर असे अनेक दुर्दैवी जीव वाचतील. पण नाही.

यामुळे घडले काय ???

तर ...

पुढील आयुष्याचे एक सुंदर स्वप्न बघणाऱ्या एका तरुणीचा, माणुसकी हरवलेल्या गर्दीने बळी घेतला होता.


(अशा घटना पुरुष आणि स्त्रियां बाबत दिवसाआड घडत असतात. थोडी माणुसकीला जाग यावी म्हणून कथेत गुंफलेली एक घटना. वाचून कोणाला आपण वाचवू शकलो, तर कोणाची स्वप्ने, कोणाचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचविल्याचे पुण्य मिळेल.

नावे बदलली आहेत. यातील नावाचा कुठेही आणि कोणाशीही संबंध जोडू नये ही विनंती.)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy