बाब्याची गोष्ट
बाब्याची गोष्ट
बाब्या यंदा आठवीला गेला होता; गेला म्हणजे मागल्या वर्साला पण याच वर्गात होता. पण तो पडला शाळेचा मोठा भक्त म्हणून नियमित वार्षिक वारी करायचा. डोक्यातली पाटी तशी कोरीच होती बाब्याच्या...!! त्याचा शाळेत राहण्याचा अनुभव हेडमास्तरापेक्षा पण जास्त होता. हेडमास्तर मागच्या वर्षीच या शाळेत बदलीवर आलं होतं. तरी बरं हे बाब्या बेणं शाळेत कमी आणि बाहेर हुंदडतानाच जास्त दिसायचं. पाटलाचं पोर म्हणून कोणी त्याच्याविरुद्ध काही बोलायला धजावायचं नाही. पाटलाचा पोर, खाऊन-पिऊन खोंडागत वाढला होता आणि तसाच वांड पण झाला होता. गावातले लोक, सगळी पोरं, त्याच्या घरातले लोक, एवढंच कशाला शाळेचे मास्तर अन हेडमास्तर बी दोन हात दूर राहायचे. कोण विंचवाच्या नांगीवर पाय देणार?
त्या दिवसाचीच गोस्ट घ्या ना..... शाळा सुटल्यावर बाब्याने आपली धोपटी हरबाच्या खांद्यावर टाकली आणि गुरगुरला,
"ये हरबा, माझं दप्तर घरी नेऊन दे आनि आयेला सांग सूर्य बुडल्यावर घरी येतो. कुटं गेला विचारलं तर सांग, मन्या मास्तर गणित आनि विंग्रजी शिकिवणार हायेत. बाकी काय बोललास तर माहित हाय नवं"
असं म्हणतात त्याने हात हवेत वर फिरवला. हरबाने जोरजोरात होकारात मान हलवली आनि बोच्याला पाय लावून पळत सुटला. बाब्या गालातल्या गालात हसत गावाबाहेरच्या आमराईकडे पळाला.
"मंजे ये मंजे, आता कुटं ऱ्हायलीस?"
आधी फिदीफिदी हसण्याचा आवाज आला आनि येका झाडामागून मुरकत मंजी बाहेर आली. दोन आवळून-चिवळुन बांधलेल्या वेण्या, पिवळ्या रिबिनींनी वेण्यांची तोंडं गच्च बंद केली होती. अंगावर छापील फुलाफुलांचं परकर-पोलकं आनि देहाचा डेरा एकशे ऐशीच्या कोनात गोल-गोल फिरवीत तोंडात एका हाताची बोटं घालून उभी होती. दुसऱ्या हातात तेल प्यायलेल्या कागदात भज्यांचं पुडकं होतं. बाब्याने तिला टपली मारली आनि एका झाडाखाली जाऊन फतकल मारून बसला. मंजी त्याच्या बाजूला जाऊन बसली आनि दोगं बी भज्या तोंडात कोंबू लागली. तेवढ्यात तिकडून सदा माने एस. टी. स्टॅंडकडे निघाला होता. त्याने हसण्याचा आवाज ऐकून आमराईकडे मान फिरवली. पण बाब्याला बघितल्यावर त्याची नजर चुकवून भूत बघितल्यासारखं पळत सुटला. पळता-पळता त्याच्या कानावर शब्द पडले, "अरे सद्या, तुझी बस हुकेल बग....SSSSS !" सदा कानावर हात ठेवून अजून जोरात पळू लागला. ती शेवटची बस हुकली तर सद्या तालुक्याला पोहोचला नसता अन त्याचं काम दोन महिने पुढे गेलं असतं. बाब्या आनि मंजी त्याची हि अवस्था पाहून खो-खो हसू लागले. तो दिसेनासा झाल्यावर पुन्हा भजी खाण्याचा कार्यक्रम परत सुरु केला. नंतर बराच वेळ, दोघे तिथे बसून गप्पा मारत बसले. सूर्य डुबीला आला तसं बाब्या घरला जायला निघाला. मंजीने त्याला थांबायला बरीच इनती केली पण काय उपेग न्हाय झाला. तशी मंजीबी पाय आपटत आपल्या घराकडे निघाली.
बाब्या घरी पाहोचला आनि बाप गरजला,
"काय रे बेन्या, कुठे उलथला व्हतास? साळा सुटून लय येळ झाला."
तेवढ्यात पाटलीन बाई माजघरातून बाहेर आल्या.
"आत्ता, असं काय करावं वं..... ते मास्तराकडे गेला व्हता बाब्या. विंग्रजी आनि गणित शिकायला....होय ना रे बाळा" बाब्याकडे कवतिकाने बघत लांबूनच पाटलीणबाईंनी कडाकडा बोटं मोडली.
"चल तुला जेवायला वाढते, लय भुका लागल्या असतील ना"
"हम्म म्हंजी यंदा पुढच्या वर्गात जायचं ठरवलं आहे कि काय म्हना...." पाटलांनी सुद्धा गडगडा हसत उगाचच आपल्या मिशीवर ताव मारला.
बाब्या कवतिकाने नाहून आतल्या बाजूला पळाला. आपल्या खोलीत खाटीवर पडून सपान बघू लागला.....आपण साळा पास जालो, मास्तर आपल्याला हार घालतायत अन बाप तोंडात पेडे कोंबतोय. लय खुस झाला गडी........
दुसऱ्या दिवशी बाब्या पुन्ना साळत निगाला, बांधावरून जाताना भाल्या आपली पेरूची बाग राखताना दिसला. सवयीने बाब्याने आपला मोर्चा बागेकडे वळवला. हाताला आलेले चार-पाच कचकचीत पेरू तोडले आणि पिशवीत कोंबले. अजून एक पेरू तोडून तोंडात कोंबू लागला. भाल्या तिकडून धावत आला.
"बाब्याशेट, कशाला गरीबाच्या पोटावं पाय देता. चार पैके घावले तर चूल पेटेल वं"
"चार पेरू घेतले तर बाग वसाड हुती काय रं" बाब्याने जरा रागानेच भाल्याकडे बघितलं.
"न्हाय जी तसं न्हाय पन, एक डाव चालेल. रोज न्यायला लागलात तर मग......" भाल्याने मान खाली घातली.
आता बाब्या जरा वैतागलाच, "भाल्या, आज एक झाड मरल बग तुज्या बागेत. पन पुन्यांदा असा बोललास तर मग......म्हाइत हाय न्हवं....."
आता भाल्या काकुळतीला आला, "नगा बाब्याशेट, असा शाप देऊ नकासा.. पाय धरतो तुमचं."
तोपर्यंत बत्तीस दात दाखवत बाब्या पसार......
त्या संध्याकाळीच भाल्याच्या बागेत वीज पडून बरोब्बर एक झाड मेलं, म्हंजी अगदी काळा ठिक्कर. कसं करावं आता......!
असाच एकदा रामदादाच्या शेतात घुसला बाब्या...... घेतली कि मक्याची कणसं वरबाडुन. वर रामदादा वराडला तर म्हनतो कसा,
"रामदादा, गेलंच बग तुज्या समद्या शेतात पानि"
दोन दिवसात अवकाळी पा
वसाच्या पाण्याने, रामदादाचे समदे शेत नेले ना आपल्याबरुबर. रामदादा नशिबाला बोल लावत डोक्याला हात लावून बसला पन सांगणार कोनाला.....!!
तर असा हा अवलादी बाब्या.....अख्खा गाव त्याला डरायचा. यामागे येक मेख व्हती. बाब्या कोनाला बी काय रागावून बोलला तर ते खरंच घडायचं. त्याची जीभ पार काळी व्हती. त्यामुळे कोनी त्याचा नाद करायचा न्हाय.
त्यादिवशी बाब्या असाच निघाला साळत जायला, बांधावरून उड्या मार, कोणाच्या शेतातून काहीबाही उचलून तोंडात नाहीतर पिशवीत टाक, काही नाही तर आंबे-बोरं-चिंचा व्हत्याच की.....!! शाळा सकाळची असली तरी बाब्या हे उद्योग सांभाळून उन्हे पार वर आली की वर्गात पोहोचायचा. त्या दिवशी, पवार मास्तर लयच कावले होते. त्यात बाब्याशेटने वर्गात प्रवेश केला. होय नाय की न्हाय नाय, मास्तराने उचलला दंडुका आणि हाणले दोन-चार बाब्याच्या पाठीत. बोंबा मारत काळा-निळा बाब्या वर्गाबाहेर पळाला. बाहेरूनच मास्तराला कचकचीत शिव्या दिली आनि बेंबीच्या देठापासून अख्ख्या शाळेला ऐकू जाईल. अशा आवाजात वराडला,
"मास्तर, आज तुजा बाप जिता न्हाय रहाणार....तू जाच घरी बग तुला खबर मिळेल"
त्या वक्ताला मास्तर ताळ्यावर आलं, पन जरा लेटच झालं. दुसऱ्या दिवशी मास्तर गावाला गेल्याचं समजलं, आता बापाचा बारावा घालूनच तो उगवणार होता शाळेत.
या घटनेनंतर, सगळ्या गावात बाब्याचा वचक लय म्हंजे लयच वाढला होता. बाब्या रस्त्यात दिसला की लोक नजर तरी चुकवायचे नाहीतर रस्ता तरी बदलायचे. बाब्या जास्तच छाती पुढे काढून चालायचा.
घरीबी बाब्याच्या करामती समजल्या होत्या त्यामुळे पाटीलबी दोन हात दूर असायचे गड्यापासून. बघता-बघता वरीस संपलं, बाब्याने कशीबशी परीक्षा दिली. मनात आपण पास न्हाई होनार ह्ये पक्कं म्हाईत होतं त्याला. पन साळा निक्काल हाती देईपर्यंत गडी गावभर उंडारत होता. आन तो दिवस उजाडला, लाल रेघांनी भरलेलं प्रगती पुस्तक बाब्या लपवून घरी घेऊन आला. बाप घरात न्हाई बगुन, माळ्यावर नीटपणी लपवून ठिवलं.
दोनच दिवसात, पाटलांच्या हाती बाब्याचं प्रगतीपुस्तक घावलं. आनि जो काय राडा झालाय घरात की ज्याचं नाव ते ! पुस्तकातल्या लाल रेघ आता पाटलाच्या चेहऱ्यावर पसरल्या व्हत्या.
"बाब्या......SSSSS " पाटील आले.
बूड वर करून खोलीत झोपलेला बाब्या खडबडून जागा होत खाटेवरुन खालीच पडला जनु. पुढच्या मिनिटाला तो बापासमोर मान खाली पाडून उबा व्हता.
"काय हाये हे बाब्याशेट" पाटलांनी त्याचं प्रगतीपुस्तक त्याच्यासमोर धरलं.
"त्ये....त्ये...." बाब्याच्या तोंडून शबूद फुटेना.
"शेपूट घोळाल्यावानी काय त्ये-त्ये करतोयस? एव्हडा मास्तराकडे बुकं वाचायला जात व्हतास आनि काय ह्ये?" पाटलांच्या डोळ्यातून आग बरसत होती.
पुढच्या मिनिटाला त्या आगीचा लोळ बाब्याच्या अंगावर कोसळला. गुराला बडवावं तसं पाटलाने बाब्याला मनसोक्त बडवून काढला. पाटील सोता दमल्यावरच त्याने हात थांबिवला.
बेशुद्ध होता-होता बाब्या वाचाळलाच, "आये तुज कुकू उद्याचा सूर्य बगणार न्हाई....."
पाटील मनातल्या मनात चरकला. पाटलीणबाईंचाही धीर सुटला. उरलेला दिसभर कुटं टाचणी पडली तरी बी पाटील दचकायचा. पोटाला अन्न जाईना. घराबाहेर पडावं तर कुठे रस्त्यात पडून, कोणी गाडीने उडवून किंवा दरीत पडून मरु म्हणून पठ्ठया घराभाइर न्हाई पडला. दिसभर घरात घामाच्या धारा लागल्या पन पंखा चालू करावा तर, अंगावर पडेल म्हणून पाटील कावराबावरा. उन्हे उतरली, रातीला घरात कोनाच्या डोळ्याला डोळा न्हाई. पाटील उंदरागत एका कोपऱ्यात सताड डोळे उघडे करून बसला व्हता. घराच्या दाराला अडसर अन एक भलं मोटे टाळे बी मारले. मनात धाकधूक व्हती, यमराजाने दारातून एन्ट्री मारली तर? पर दुसरा हा बी येक विचार, यमाला एन्ट्री मारायला दरवाजा कशाला, तो घुसायचा तर कुटून बी घुसेल. डोक्याचा नुसता इस्कोट झाला व्हता पाटलाच्या. पहाटे येरवाळीच दारावर थाप पडली, पाटलाचा प्रान पर जिभेवर आला.
"दार उघडायचं न्हाय" त्या अवस्थेतही पाटील गरजले.
दरवाजाची थाप अजून जोरजोरात पडाया लागली अन वर हाकारे बी यायला लागले.
"पाटील, वो पाटील वाईच दार उघड. येक वाईट खबर हाय"
पाटील भीतीने अजूनच उडाया लागले, पाटलीणबाई तर मुसळधार रडू लागल्या. सगळा निस्ता गोंधळ माजला. तेवढ्यात बाब्या डोळं चोळीत भाईर आला अन सरळ जाऊन दरवाजा उघडला.
"एवढे तुम्ही समदे जागे व्हतात तर येकाला बी दार ठोकल्याचं ऐकू येऊ नये? ऑ?" बाब्या कावून बोलला.
पाटील तोपर्यंत माडीवर पळाले व्हते. सगळा धीर एकवटून पाटलीणबाई दाराशी गेल्या. दारात बाजूच्या महिपतीला बघून सैलावल्या.
"अवो ऐकलासा काय!" पाटलीणबाई माडीवरच्या खोलीच्या दारात उब ऱ्हाऊन पाटलासनी हाक माराया लागल्या.
पाटलाने हळूच मान वर केली.
"अवो, ते महिपतीचा बाप खपला एक घंट्यापूर्वी"..........!!!!