STORYMIRROR

Sachin Jagtap

Others

4  

Sachin Jagtap

Others

यमाकडची परीक्षा

यमाकडची परीक्षा

1 min
27.9K


नरका मध्ये पापी लोकांचे

पेपरवर पेपर चालले होते

यमाच्या दरबारी पेपर ते

चित्रगुप्ताने काढले होते

उत्तर चुकता, वाढणार पाप होते

कॉपी न करणाऱ्याला, गुन्हे माफ होते

पेपर ते स्वतः यम तपासणार होता

विद्यार्थी होते त्यात, सर्वपक्षीय नेता

इलेक्शनचे फार्म जसे, भरावे घाईघाई

 लिहू लागले सारे, स्वकर्माची नवलाई

गणितामध्ये घातला, यांनी मोठाच राडा

पेपरात लिहीला फक्त, आश्वासनांचा पाढा

मराठी विषयात यांचे, सुरू झाले नारे

कर्म लिहीण्यास सांगता,पेपर सोडले कोरे

इंग्रजीसाठी नाही, पुरवणीला तोटा

मंजुर केल्या शाळा! घेऊनी बक्कळ नोटा

हिंदीच्या प्रश्नास उत्तरे यांची भारी

देशसे हटानी है गरिबी की बिमारी

भूगोल पाहून डोळे फिरले, यांचे गोल गोल

भोपळा नको म्हणून केली, खाणींची पोलखोल

अर्थशास्त्रात यांचा, असे मोठा हातखंडा

लिहीले शेतकऱ्यांना, कसा  घातला गंडा

राज्यशास्त्रात या व्यक्ती तश्या महान

तत्व लिहीले, 'देश कसा ठेवावा गहाण'

विज्ञानाशी यांचा, नेहमी छत्तीसचा आकडा

पुढे चालले दुसरे देश, चला त्यांना पकडा

इतीहासाला सुरु झाली, याचीत्याची कॉपी

पेपरात ठरले सगळे नेते, सर्वोत्तम महापापी

मार्क बघून तेव्हा यांचा, पारा मग चढला

यमराज म्हणे तुंम्हाला, भ्रष्टाचारच नडला

मिळालेली संधी यांनी, अशी कशी दवडली

सारी बोलघेवडी शेवटी, नरकातच सडली.

 


Rate this content
Log in