ती
ती
त्याने बघायला आलं तर
काही हरकत नाही
तिने मात्र बघायला गेलं
तर..
काय बिनलाजी बाई
लग्नात त्याच्या घरच्यांनी
मिरवावा मोठा तोरा
तिच्या आई बापानी का?
लुटवावा काडीकाडीचा संसार सारा
त्याने विचारले तिला
काय घेऊन आलीस माहेराहून
' तुमच्या आई ला आई म्हणते नी मानतेही '
काय हवंय अधिक या संस्काराहून
तो म्हणाला तिला ...
तुला माझ्या नातलगांसाठी
वेळच नाही
अरे वर्षातून नव्याण्णव टक्के तुमच्या सोबतच
ना!
याहून अधिक हवंय का काही
त्याने मिळवलेल्या यशाला
डोक्यावर घेऊन हिने नाचावं
तिच्या गुणवत्तेने मात्र...
कपाटात किंवा अडगळीत का सडावं
त्याने घेतलेल्या घरावर
त्याच्याच नावाची पाटी आहे
त्याच घराला घरपण देऊनही
ती म्हणत नाही की पाटी खोटी आहे
याची अपेक्षा ...तिने उठ म्हटलं की उठावे
बस म्हटलं की बसावे
तिची अपेक्षा सातजन्मी
यानेच आयुष्यात यावे
राग येता त्याने मार मार मारावे
तिला मात्र वाटते आपण
सौभाग्यवतीच मरावे
बघा तिच्या त्यागाचा ..विचार
एकदा तरी व्हावा
दोन प्रेमळ शब्दांचा आधार तिला द्यावा
जमतंय का बघा प्रयत्न करून
नाहीतर ....
बघाल जेव्हा क्षितिजाकडे
आधाराला काठी धरून
ती सांगे दुरून ..खूप ..खूप दुरून
'राजा वेळ गेलीय रे सरून'...
