STORYMIRROR

Swati Damle

Others

3  

Swati Damle

Others

'स्त्री जन्म '

'स्त्री जन्म '

1 min
681


'स्त्री ' जन्म


स्त्री जन्मा तूं नितांत सुंदर भासतसे हिरकणी

अष्टपैलूंनी लखलखणारी मनोहारी रमणी


कन्या,भगिनी,जाया,माता विविध रूपे नटली

स्नुषा,भावजय,सखी,नणंदही अंतरी सामावली


महिमा शतकाशतकातूनी तव वनिते किती वर्णिती

दुर्गा,अंबा,उध्दरण्या जग स्वर्गातूनी प्रगटती


माया,ममता,प्रेम,करूणा दयार्द्र मन तव ते

संयम मर्यादांच्या म्यानी वीरश्री तळपते


पंचकन्यकांची नित करिती प्रभातीस वंदना

सतीसावित्री,तपस्विनी त्या स्वाभिमानी ललना


पराक्रमाने जिजा,अहिल्या,लक्ष्मी,झळझळल्या

सुवर्णाक्षरे इतिहासाच्या पानावरी विलसल्या


वेदशास्त्रपारंगत असती विदुषी ललना त्या

राजसभापटु,राजकारणी,विजिगिषु ललना त्या


गगनाला घालीत गवसणी आजही त्या लढती

स्वयंप्रकाशित स्वकर्तृत्वे श्रेष्ठपदे भूषविती


अपूर्व,सुंदर पुष्पांमधुनी एखादी 'कैकयी'

जिने धाडिला राम वनांतरी पुत्रमोह म्हणुनी


पेशवेपदी मोहित झाली 'आनंदी' मोहिनी

करूनि 'ध' चा 'मा' जाहली लांछित कलंकिनी


असेच असते डावे उजवे उडदामधि काळे

शापित रत्ने समजूनि त्यांना माफ आम्ही केले


देशभक्त,शास्त्रज्ञ,सुधारक जन्मा जी घालते

सृजनशील या वसुंधरेशी नाते ती जोडते


करूनी साधना,संस्कार,संस्कृति जगात जी रूजवते

'स्त्री जन्मा' चे म्हणुनी मजला अप्रुप किती वाटते



Rate this content
Log in