स्त्री जीवनाचे दुःख
स्त्री जीवनाचे दुःख


सृष्टी सारी निर्माण केली भगवंतांनी
स्त्रीला बनवताना घेतले कष्ट अपार
नाजूक रूप, सौंदर्य व सहनशीलता
भरली तिच्या नसानसात फार
जन्मतःच मुलगी म्हणून मिळे हेटाळणी
वंशाचा दिवा नसून, धनाची पेटी परक्याची
स्त्रियांना मान कमीच पुरूष प्रधान संस्कृतीत
शिक्षीत, कमावती, तरी चिंता तिच्या संसाराची
लग्न लागताच विविध नाते बंध डोक्यावर
माहेर सोडून सासरचे रितीरिवाज पाळायचे
सासर-माहेर तारेवरच्या कसरतीने सांभाळून
विकृत माणसांपासून सदा स्वतःला जपायचे
पुत्री, भगिनी, भार्या, स्नुषा, माता, सासू, आजी
अशा दालनातली कार्ये निमूट निस्तरायची
कधी कधी हे करत असता भव्य दिव्यातून
जावे लागले तरी दुःख आपल्यातच ठेवायची
नवदुर्गा रुप दिले स्त्रीला दुःखाचे डोंगर पेलायला
एकटी असली तरी ती सक्षम असते सावरायला
अबला वाटत असली ती सामान्य जनतेला तरी
वेळ प्रसंग येताच ती प्रकट होऊन जाते सबला