सोयाबीन...!
सोयाबीन...!
सोयाबीन म्हटलं की मला
अजूनही ते दिवस आठवतात
आणि माझ्या शिक्षणाच्या
ऐसी तैसीची आठवण करून देतात
शिक्षण घेऊन मी शेतीकडे वळलो
नवीन जोम नवीन उर्मी घेऊन
वावरात मोठ्या उत्साहात शिरलो
काहीतरी चांगले करायचे म्हणून
सोयाबीनचे पीक घेतले
शिवार चांगलेच फुलले
समाधान वाटले देव पावला
म्हणून मग तिरुपती गाठले
देव दर्शन घेऊन खाऊन पिऊन
चार दिवसांनी परत शिवारात आलो
पाहतो तर काय
सारे शिवारच करपून गेले
धस्स झाले म्हटले असा कधी
देव पावतो की काय
पाया खालची जमीन सरकली
आणि पोटातली भूक ही हरपली
दिवस विमनस्क अवस्थेत गेला
तेव्हा भावाने कानोसा घेतला
त्याला राहवले नाही म्हणून
धीर देण्याचा प्रयत्न केला
आम्ही दोघेही नवखे
दोघेही अचंबित आणि दुःखी
ताटातली भाकरी सुद्धा
वाटू लागली तेव्हा सुक्की सुक्की
दुसरे दिवशी भावाने हाक मारली
मला घेऊनच रानाची वाट धरली
शिवारात हात धरून घेऊन गेला
देव कसा पावला ते दाखवू लागला
डोळ्यांचे पारणे फिटले
आनंदी आनंद झाला
जीव भांड्यात पडला
जेव्हा सोयाबीनच्या शेंगांचा घड पाहिला
चार फुटाच चार दिसापूर्वीच झाड
पान गळून परिपक्व होऊन उभं होतं
काढणीची वाट पहात
माझ्याकडे हसून पहात होत
यथावकाश काढणी झाली
मळणीही झाली
सोयाबीनची पहिली रास
लक्ष्मीचे रूप घेऊन घरी आली
आजही सोयाबीन म्हटले
की ते नवखे दिवस आठवतात
आणि अज्ञानाची खिल्ली उडवतात
पण कौतुकाचे डोळ्यात पाणी साठवतात...!
