संवेदना
संवेदना
मंगल मनोभूमीचे झाले पठार आता
संवेदनाच येथे झाल्यात ठार आता ।।धृ।।
सर्व्हे कुपोषणाचा करण्यास लोक आले
गणितासमान जैसे प्रेते मोजून गेले
पक्वान्न खात झाला सर्व्हे तयार आता।।१।।
आधार भारताचा आहे किसान जेथे
मरणेच आज त्याचे झाले आसान तेथे
मृत्यूस करुणेची केवळ किनार आता।।२।।
संगीत जीवनाचे हरवून आज गेले
सुक्या बरोबरीने जळते इथेच ओले
मनोरंजनास आले ते डान्स बार आता।।३।।
दुःशासन द्रौपदीच्या वस्त्रास हात घाली
भीष्म द्रोणादि रथींच्या माना झुकल्यात खाली
सर्वांसमक्ष पोरी लुटती गिधाड आता।।४।।
बंधू भगिनींच्याही नात्यात स्वार्थ घुसला
ठसा पवित्रतेचा केव्हाच पार पुसला
झाले मातापित्यांस्तव आश्रम फार आता।।५।।
गुरुशिष्य परंपरेचा केव्हाच ऱ्हास झाला
राक्षस भोगवादी गुरुजी मध्येही बसला
ज्ञानमंदिरेही येथे झाले बाजार आता।।६।।
घेऊन विचार आता, फुलवू निखार आता
विकृतीच्या मुळाशी घालू प्रहार आता जागवून पौरुषाला करूया निर्धार आता
संवेदनेस चढवू तेजाची धार आता।।७।।
