संसाराचे गाणे
संसाराचे गाणे
*संसाराचे गाणे*
सुख दु:खांना फुटते वाचा
संसाराचे गाता गाणे,
आयुष्याच्या वाटेवरती
असतात कडुगोड तराणे.
घरासोबत होऊन एकरुप
गृहलक्ष्मी हाकते संसारगाढा,
पेलून सदैव ती कर्तव्यांना
करते दूर संघर्षाचा तिढा.
साथ लाभता जोडीदाराची
हटत नाही कधी माघारी,
डगमगून नाही कोलमडत
संकटांवरही करते स्वारी.
कुटूंबाला जोडण्या घट्ट
गुंफते प्रेम धाग्याची गुंफन,
सावरते क्षणोक्षणी मायेने
आपुलकीचे घालून कुंपन.
संसार थाटण्यास नेटका
पती पत्नीत लागतो मेळ,
कधीही जोडा नि तोडा असा
नसतो तो भातुकलीचा खेळ.
एकमेकांना समजून घेत
नाते टिकते विश्वासावर,
घराला घरपण येण्यासाठी
हृदयात असावा सदा आदर.
मी पणा नसेल मनी तर
निघेल गोड संसार गीत,
मधुर स्वरांनी गुंजेल धरती
बहरेल मग दोघांची प्रीत.
