सत्याचा वारा लागू द्या
सत्याचा वारा लागू द्या
1 min
26.6K
*वृत्त*:- कल्याण
*लगावली*:- गागागागा, गागागागा, गागागागा
रोखावा खोट्याचा पळता घोडा आता।
सत्याचा वारा लागू द्या थोडा आता।।१।।
टाळावे थोडे बापाने रागे भरणे।
पोराला येतो बापाचा जोडा आता।।२।।
रांधा, वाढा, उष्टी काढा कुठवर बाई।
नारीत्वाच्या खोट्या बेड्या तोडा आता।।३।।
सांभाळावे कुठवर सारे स्वार्थी नाते।
स्वार्थापायी खोटे धंदे सोडा आता।।४।।
रानामधली झाडे वेली तोडत सुटले।
सृष्टीशी प्रेमाचे नाते जोडा आता।।५।।
हाणामारी दंगेधोपे वस्तीमध्ये।
दुसऱ्यांच्या माथ्यावर खापर फोडा आता।।६।।
गर्भामधल्या कन्येची का वाट अडवता।
विकृतींच्या पायी घाला खोडा आता।।७।।
