शब्द अबोल झाले आज
शब्द अबोल झाले आज
ज्या रंगाने रंगवली स्वप्ने मी
सारे रंगीत केले आज
त्या रंगांनीच साऱ्या मला
बेजार केले आज
तो हसून जातो म्हणाला
मी ऐकून त्याचे बोल
शब्दही लाचार माझे मी
नाही केले आज
फुलांचा घेऊन सुगंध
ओंजळीत टोचले काटे
त्या बेरंगी फुलांनी माझे
स्वागत केले आज
तुला मारलेली हाक
ओठात माझ्या बंद झाली
बोलक्या त्या शब्दांनी
शब्दच अबोल केले आज
सुनामी होऊन आलास
घरटे माझे लुटून नेले
ओसरला पूर आता
मल्हार बंदिस्त केले आज
माझ्या मनात तुझी रे
अजूनही तशीच छबी आहे
वेड लावून मनाला तू
फुलांनी वार केले आज
निःशब्द आसवांनी माझ्या
नयन वाहून गेले रे
डोळ्यात तुझीच प्रतिमा
किती सहन केले आज