सावित्रीच्या लेकींनो
सावित्रीच्या लेकींनो
नवरात्रोत्सव म्हणजे सुख-शांती
मांगल्य-समृद्धीचे भजन;
घरोघरी नवदुर्गांचे मनातील
भक्तीभावाने पूजन
नवरात्रीचे नऊ दिवस
दिसते नवरंगांची उधळण;
श्रद्धेच्या बाजारात नवविचार
नवकल्पनांची बोळवण
सावित्रीच्या स्वप्नांचा
लेकींकडूनच होतोय भंग;
नवरात्रीचे नऊ दिवस
साडीवर येतोय नवा रंग
महिलांनो, रंग उधळण्याचे
दिवस तुम्हांला कोणामुळे दिसले?
दगड-गोटे, शेणा-मातीचे रंग
जिने तुमच्यासाठी सोसले
कुणाला पुजावे? कुणाला भजावे?
हे चिंतनांती महिलांनी ठरवावे;
आपल्या उद्धारकर्त्या सावित्रीचे
आदर्श डोक्यात गिरवावे
संगीतमय गरब्याचा आनंद,
कोणतीतरी देवी अंगात आहे;
ज्ञानगंगेची झाली गटारगंगा
स्त्री-पुरुष समानता रंगात आहे
आई-बहीण-पत्नी-लेक या
नवदुर्गांचे करू या नमन;
पण असभ्य शृंगारिक
धांगडधिंग्याचेही करू शमन
