राजकारणी
राजकारणी
'राजकारणी'
'राज ' का 'रण ' खेळ खेळती राजकारणी सत्तेत
चाणक्याच्या कुटील नीतीचे शास्त्र तयांना अवगत
मंगळ,राहू,केतू जमती पत्रिकेत कधी एक गृही
शनैश्र्वराच्या सहकार्याने जिंकीत असती कधी मही
हुतुतू ,खो-खो, सारीपाटही डाव रंगतो कधीमधी
मंगळ वक्री झाला म्हणूनि 'खो ' मिळतो नरदेस आधी
काट्याने काढावा काटा,हेतू अंतरी ठेवून
कधी करावी पाठराखणी,सोडावी ती कधी साथ
गुंडाळून ठेवून तत्वांना, नव्या युतींची कास धरा
सत्तास्पर्धी तरण्यासाठी, पक्षांतर ते त्वरीत करा
कधी 'होयबा ' म्हणूनि डोलवा मान अति लाचारीने
तरणोपाय नसतांना घालिती, चरणी लोटांगणे
चाबूक घेऊन कुणी बैसावे, ओढावे ते फटकारे
ससेहोलपट होते तरीही नाकदु-या त्या काढा रे
कधी करावी सिंहगर्जना, मूग गिळूनी कधी बैसावे
काथ्याकूट, खल, चर्चा प्रश्र्नी सभागृह ते त्यागावे
नाही शिस्त, नाही गोडी अभ्यासही ना प्रश्र्नांचा
अनंत कसली ध्येयासक्ती मतलब अपुल्या खुर्चीचा
लोकशाहीचे अहितकर्ते संसदपटु हे मिरविती
राजकारणी यासम दुसरे जगात ना कोठे दिसती
