पुतळे
पुतळे
त्यांनी मला घेरलं
तेव्हा मी हेरलं
की ते खून करू पाहत होते
माझ्या डोक्यात भिनलेल्या विचारांचा
जातीवादाचा कोयता परजून
माझ्या नावाचा मागोवा घेत
ते इतिहासाच्या पानांशी खेळू लागले
पण मी त्यांना मागमूसही लागू दिला नाही
कारण जुनाट झालेली गोत्रबित्र
ठेवली होती मी गुंडाळून बासनात
आता मात्र माघार न घेता
ते वळले धर्माच्या वाटेवर
आणि तपासू लागले माझे शरीर
शेंडी नाही तर जानव्यासाठी
इतकं करून झाल्यावर
क्रुस वा कृपाणसुद्धा दिसेना
म्हणून की काय त्यांनी
सरतेशेवटी हात घातला दाढीला
तर तीही नव्हती
मग काहीतरी मिळेल या आशेने
ते वळले माझ्या धमन्यांत संचारणाऱ्या
शेरभर सळसळत्या रक्ताकडे
तेव्हा कळले त्यांना
की मी फक्त माणूस नि केवळ
एक निर्भय माणूसच होतो
ज्याला नव्हती कोणत्याच शस्त्रांची भीती
किंवा कोणत्याही रंगाच्या झेंड्याची
जे माझ्या मानवी इमानाला गुंडाळू शकलं असतं
आता मात्र ते झालेत अगदी हतबल
आणि मी शोधतोय
आपल्या आसपासचे उरलेसुरले
मानवधर्माचे सजीव पुतळे.
