प्रीत आपल्या दोघांची
प्रीत आपल्या दोघांची


स्वप्नांच्या त्या पुष्पपठारी, चालताना सवे
पाहिले तुला मी, तू मला पाहताना सये
कपोली प्रिये तुझ्या, नभाची गं लाली
प्रीत आपल्या दोघांची आज रंगात आली
सांडलेले नभात सार्या, चांदण्यांचे मळे
भुईवर फुलली इथल्या, काजव्यांची फुले
सुगंधात तव श्वासांच्या निशा धुंद न्हाली
प्रीत आपल्या दोघांची आज रंगात आली
हातात हात तुझा की, नुसताच भास सारा
नयनांत तुझ्या गुंतण्याचा, खेळ हाच न्यारा
भान कोणा प्रभा की, आता रात्र झाली
प्रीत आपल्या दोघांची आज रंगात आली
मीलनाचा आता आपल्या, वेळ सांग केव्हा
पाऊस श्रावणाचा की वसंता, बहार येईल तेव्हा
चित्र आपले काढले फुलांनी, इथे भोवताली
प्रीत आपल्या दोघांची आज रंगात आली