प्रार्थना..
प्रार्थना..
प्रभात समयी तुला
पाहतो रे गजानना
सूचिर्भूत होउनी...
तू चौदा विद्यांचा स्वामी
चौसष्ठ कलांचा अधिपती
नमस्कार करतो कर जोडुनी...
आचमने संकल्प सोडूनी
आरंभिली तव पूजा
प्रसन्न चित्त मनोभावे राहुनी....
प्रक्षालून पदकमलांना
हळद कुंकू लावले अन
सुमने अर्पिली नतमस्तक होउनी..
नेवैद्य गोड मोदकाचा
बघ डोळे उघडून
गरम गरम केले उकड काढुनी..
उदबत्ती,धूप आरती
सजविली फुलवात
प्रज्वलित निरांजन ताम्हणात घेऊनी..
आरती म्हणतो श्री गजानना
श्रवण करी मनापासुनी
प्रेमाने ऐक रे आता कान देऊनी...
सुखकरता तू गजानन
तूच रे दुःख हरता
आशीर्वाद दे प्रसन्न होउनी..
चुकले असेल काही
तरी लेकरू तुझेच
म्हणून रे घे आता संभाळूनी....!
