पहिला पाऊस
पहिला पाऊस
आला पहिला पाऊस सरी कोसळून गेला
संतप्त धरतीचा श्वास मोकळा करून गेला
बरसल्या अवनीवर पाऊसधारा, कल्लोळ
मेघराजांचा विजेच्या ढोलकीवर वाजवून गेला
आसुसलेलं जीव, तळमळली समस्त पृथ्वी
खेळून अंगाखांद्यावर निसर्गाला तृप्त करून गेला
अंकुरले बीज गर्भात धरतीच्या, नवजीवनाचा काळ आला
नेसवून हिरवा शालू शृंगार अवनीचा करून गेला
सुवासिक मनमोहक अत्तर मातीच्या गंधाचे
काजळ लावले मुसळधार पावसाचे
नवचैतन्याची कोरून लेणी गेला
उधळला मोत्यांचा सडा रुपात पावसाच्या
थिरकले गोड नादात बेभान तारुण्याचा
संगीत पावसाचे मदमस्त झुलवून गेला
आकाश धरतीवर झुकले,ढग काळे काळे ठाण मांडून बसले
प्राणिमात्र सुखावले, गाणी वाऱ्यासंगे गाऊन प्रेमधारा बरसून गेला
गारवा गारठत खेळ ऊन पावसाचा झाला
कधी भिजावे कधी वाळावे देह ओलाचिंब करून गेला
मन पाखरू पाखरू उडतं वाऱ्यासंगे उंच
हर्ष दाटला उरात पाऊस नाचवून गेला
