पेटी...!!
पेटी...!!
पेटी नाव उच्चारताच
पटापटा विचारांना फाटे फुटतात
ग्रामीण भागापासून ते
थेट शहरी भागापर्यंत जातात
पेटी, ट्रंक, पेटारा, अस करत करत
ग्रामीण भागात पेटी पेटीच असते
आणि शहरी भागात पेटी
नाव धारण करते सूर पेटी
सूरपेटी मग सुरावट धरत
हळूहळू नाव घेते हार्मोनियम
आणि ग्रामीण भागात मात्र
तिची होते वाजवायची पेटी
सातही सूर जुळतात
काळी दोन पांढरी चार करत
लेका सुरात वाजव म्हणत
भजनाचा ठेका धरतात
तबल्याच्या साथीन पेटी
गपगुमान काही न कळताच वाजते
शहरात मात्र ती सुरासाठी
सुरावटीची पट्टी घेऊन नटते
गोडवा मात्र शास्त्रीय पेक्षा
गावठीच बरा वाटतो
कारण तिथे बिदागीचा
प्रश्नच येत नसतो
पेटी कशी जीव ओतून
बेंबी पासून आवाज काढते
शहरात मात्र ती
संगीतकाराचा काठीवर थिरकते
मोकळं जनावर रांगड
सौन्दर्य घेऊन मिरवते
पण पिंजऱ्यातलंं पाखरू
मात्र दबकत दबकतच गाते
पण सात सुरांची जादू
हाताहातावर बदलत जाते
पेटी मात्र आपलं पावित्र्य
मनापासून जपते
म्हणून मला पेटी
खूप खूप आवडते
जेव्हा ती आपणहून
गायकाला गुरू मानून साथ देते....!!!
