पाऊसओढ
पाऊसओढ


खरं तर बाष्पीभवन होऊन ढगातून जे पाणी पडतं
त्याला आपण पाऊस म्हणतो
हे झालं विज्ञानशास्त्र
पण मनाच्या शास्त्राचं काय?
अशा वेळेला
मी बाष्पीभवन वगरे विसरते
आणि सरळ मातीचं ढेकूळ होते
तुझ्या येण्याची वाट पाहत
पार ढग ही होते
आणि मग तुही सैराट प्रवेश करतोस
तोच झिंगाटपणा घेऊन
अक्षरशः माझ्यावर तुटून पडतोस
तुझ्या असंख्य ओठानी
मला स्पर्श करतोस
तुझा स्पर्श म्हणजेच काय ते?
हा... मातीचा सुगंध म्हणतात
एरवी नुसतं पाणी पडून येणारा गंध वेगळा
आणि हा वेगळा
तुझ्या स्पर्शाने मी इतकी गंधित होते
आ
णि तुझ्या बरसण्याने
पावसातीत...
थोड्या वेळासाठी मी माझं बाईपण विसरते
अशा वेळेला मला फक्त तू दिसतोस
तूच मिठी होतोस आणि
तूच माझा असतोस
अगदी थोडा वेळ
समाजाने घातलेले सगळे नियम,अटी
सगळं विसरून मी तुझ्यात
आणि तू माझ्यात विलीन होतोस
तुला खरं तर मी
आणि मला खरं तर तू कायमचाच सोबती पाहिजे असतोस
पण मला माहिती आहे
तुझं हि एक वेगळं आभाळ आहे
जिथे परतणं हा समाजाचा,निसर्गाचा नियमच आहे
पण तरीही तुझी हि पाऊसओढ काही सुटत नाही
आणि तुझ्यासोबत मी नाही
पण तो गंध पाऊसओढ होणं
काही थांबत नाही....