ओढ पावसाची
ओढ पावसाची


चित्त दाह दाह करी
लागे ओढ पावसाची
पाण्याविना लागे मरी
लाही झालीया देहाची
नांगरणी झाली शेतामधी
बसला जीव घेऊन मुठीत
वेध लागे आभायामधी
घड्या पडल्या आठीत
कधी बरसेल बळीराजा
चिंता सतावू लागे मनी
एक एक दिस करी वजा
काही नसे मग ध्यानी
बा पडला खाटेवरी
नसे औषध ना पाणी
ध्यान असे नभावरी
अशी करूण कहाणी
लेकरू विचारे बापा
घेशील ना नवी जोडी
अश्रू लपवून मारे थापा
आता चालतील थोडी
लेकीला ओढ माहेराची
रातदिन राबे रानामधी
सणाला कशी आणायाची
दमडी नसे खिश्यामधी
लागे ओढ पावसाची
सुन्न झाल्या चारी दिशा
पर्वा करे ना जीवाची
पदरी राहे फक्त निराशा