मुली
मुली
मुली असतात हसर्या , निरागस
नाचतात, खेळतात, बागडतात आपल्यातच. ..
कधी असतात न उमललेल्या कळ्यांगत
कधी असतात झाडावरून गळलेल्या फुलागत...
कधी पाना पानातून डोकावणारया फुलागत
कधी जमीनीवर गळून पडलेल्या फुलागत
तर कधी वाऱ्याने झुलणाऱ्या फांद्यांगत
तर कधी असतात पालापाचोळयागत
पेटतात कधी कचर्यागत ...
कधी असतात प्रवाहात पाण्यागत
पुढे पुढे जाणाऱ्या
कधी असतात नदी किनाऱ्यांतून बंदिस्तपणे वाहणाऱ्या
कधी असतात धबधब्यासाखया उंचावरून कोसळणाऱ्या अविरत
कधी असतात पावसाळ्यात वाहणाऱ्या झ़र्यागत
कधी असतात सागराला मीळणाऱ्या
प्रत्येक लाटेगणीक किनार्याकडे झेपावणार्य
कधी असतात भोवर्यागत गोल गोल गर्तेत लुप्त होणाऱ्या
कधी असतात डबक्यातच तरंगणार्या
ऑक्सिजन अभावी गुदमरणार्या
कधी असतात धो-धो कोसळणाऱ्या पावसागत
मातीत मिसळून वाहून जाणाऱ्या
कधी असतात कडाडणाऱ्या वीजेगत
क्षणभर चमकून आकाशातच विलीन होणाऱ्या...
कधी जगतात राजकन्येगत
तर कधी राज्ञीपण मिरवतात आयुष्यभर
कधी कधी भोगत असतात दासीपण अखेरपर्यंत
माहीत असतो फोलपणा तरीही
धुंडाळत बसतात स्वप्नांना उगीचच
जपत बसतात मैत्री फक्त अंगणाशी
आणी भिंतीआतील जगाशी
आकाशाशी नसते कधी संगत
झेपावणार्य हातांना असते बांगड्यांचे रिंगण
अन् विचारांना परंपरांचे बंधन
चुलीवरच्या प्रकाशाने उजळलेला चेहरा
खुल्या जगात कोमेजलेला असतोच
उडवण्याचा भाग्य फक्त लाखातल्या एकीलाच. ..
कधी असतात त्या मंदपणे तेवणाऱ्या वातीगत
कधी करंड्यातील हळदीकुंकवाच्या टिक्यागत
कधी असतात जळत जळत सुगंध पसरविणाऱ्या उदबत्तीगत
आणि संपून जातात कपरागत. ...
मुली कधी असतात लाजाळू, धीट, तर कधी परखड
तलवारीच्या पात्यागत लखाखणाऱ्या
तर कधी कायमच ढाल बनून रहाणाऱ्या
आई -वडिलांसाठी त्या असतात
कायमच बावनकशी सोनं अन् काळजाचा तुकडा
सासरघरच्या त्या असतात शापित गंधर्व. ...
