मराठीचा मनोरा
मराठीचा मनोरा
1 min
400
माय मराठीची आम्ही पोरं ,
जाहलो उदंड यदाकदा |
मराठीचाच मनोरा आम्ही ,
नभी उंचावला अनेकदा |
मराठीचा मान मेळवाया ,
शब्द पाश्चिमात्य घालवाया |
बाॅम्बेची मुंबई केली आम्ही ,
महाराष्ट्र मनी भुषवाया |
ह्या मराठमोळ्या भावनांचा ,
तू मोगरा फुलवावा मनी |
श्रावणातल्या सरींसारखे ,
मातीस टाकावे गंधाळुनी |
ऋणानुबंध जसे मातीशी ,
तसे ते मराठीशी जपावे |
राखावया ईमान मातीशी ,
बोलुन मराठी धन्य व्हावे |
यावे हिच्या कुशीत पामरा ,
नसोत वेदना तव ओठी |
अमृताशी पैज लावूनिया ,
फुंकर घाले माय मराठी |