म्हातारी
म्हातारी
ती एक म्हातारी मरायला टेकलेली
गरीबीच्या ओझ्याने पुरती वाकलेली.
मोतीबिंदू झालेल्या एका डोळ्याने
पाहत बसते रंगीबेरंगी स्वप्ने.
म्हातारीने स्वप्नांना झोपविले झोळीत
झोका देत बसली डोळे चोळीत.
फाटक्या गोधडीतून स्वप्ने खाली पडली
बिचारीला त्याची खबर ना लागली.
चार दिवस रडून केला आकांत
विसरली स्वप्ने मग झाली शांत.
पुन्हा तिच्या स्वप्नांनी धरली उभारी
ठेवली अडकवून खुंटीवर सारी.
आता मात्र म्हातारी सावध होती
बिचारी जागायची दिवसा राती.
मध्येच कधीतरी डोळा लागला
सारीच स्वप्ने गेली चोरीला.
इवलंस स्वप्न ठेवलं चुलीमागे
धगीने स्वप्न वितळू लागे.
उशीला लगडली स्वप्ने आता
म्हातारीला त्याचा नव्हताच पत्ता.
डोळ्यांची धार रातभर वाहिली
म्हातारीची स्वप्ने भिजून गेली.
म्हातारी फिरते गल्लीबोळातून
स्वप्नांना उराशी धरते आवळून.
स्वप्नांच्या चिंध्या बोचक्यात भरते
पोरांची फौज मागे मागे फिरते.
फिदीफिदी हसत म्हणतं कुणीतरी
ती बघा चालली वेडी म्हातारी....
