STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

मायबोली

मायबोली

1 min
198

सह्याद्रीच्या सह्यकड्यांतून

जसे धबधबे कोसळती

बकुळ फुलापरि सुगंधित

माय मराठी ओघवती    (1)


दर कोसाला भाषा बदले

ढंग तिचा असे न्यारा

नवखा येथे चकित होई 

बोलीमधे विविधता     (2)


हेल काढूनी कुणी बोलती

कुणी बोलती तडातडा

ताडन खंडन शब्दांमध्ये

अंतरामधे गोड गरा      (3)


नाटक बोलपटामधे

खुमारी संवादांची असे 

नऊरसांच्या नवाविष्कारे

माय मराठी अधिक खुले   (4)


वक्तृत्व मंडळातूनी

चर्चा प्रबोधन होई 

देता आपुले मत पटवुनी

सौम्य, आग्रही, आक्रमकही (5)


गीतातुनी नवरंग साज

खुले नित शब्दांतूनी

शब्दसुमने सजे गीत 

बहरे सप्तसुरांतूनी      (6)


लय, ताल, स्वर नर्तनी

संगीतमय माय मराठी 

श्रेष्ठ लता आशा सुमनजी

शब्द शब्द सुस्वर कंठी    (7)


वळवावी तशी ती वळते 

अवघडच नवख्यांना

द्वयर्थी शब्दांचेही देणे

नुमजे नवशिक्यांना     (8)


अमृतातेही पैजा जिंके

शब्दरत्नांची असे खाण

उपमा, अलंकारे खुले

शब्दांचा लेऊनी साज     (9)


ज्ञानेश्वरी , भागवत , गीता 

तुरे झळकती शिरपेची

कविता ,लेख ,समीक्षा ,कथा 

अनमोल लेणी मराठीची   (10)


पूजनीय माय मराठी 

मम नमन मनोभावे

पुनर्जन्म मिळो मराठी 

अंतरीची मनीषा बोले    (11)


Rate this content
Log in