माती
माती
माणसाच्या जीवनाला
मातीविना मोल नाही
स्वार्थी जगात राहिली
मातीसम ओल नाही
पिऊनिया रसायने
तिच्या उरी उठे कळ
माणसाला पोसायचे
कसे यावे तिला बळ
तुला समजेना कसे
कूस करंटी ती नाही
स्वार्थी जगात राहिली
मातीसम ओल नाही
तुझ्या अडीला नडीला
माती गहाण टाकतो
हुंड्यासाठी तू लेकीच्या
काळ्या आईला विकतो
सारे अबोल सोसते
तिच्या मनी सल नाही
स्वार्थी जगात राहिली
मातीसम ओल नाही
तिची अपार पुण्याई
कधी कमी नको लेखू
दीड दमडीच्या पायी
माय माती नको विकू
दोष देण्याआधी तिला
कर्म तुझे तोल काही
स्वार्थी जगात राहिली
मातीसम ओल नाही
तुझ्या दमल्या देहाला
माती देईल विसावा
नको हताश होऊ रे
कर मातीची तू सेवा
धर ध्यानी तू मैतरा
खोटा माझा बोल नाही
मातीविना माणसाच्या
जीवनाला मोल नाही