माझ्या माहेराला जावे...
माझ्या माहेराला जावे...


मला आज वाटे...
माझ्या माहेराला जावे...
माझ्या मायबापा...
डोळे भरूनी पहावे...||
निजावे आईच्या कुशीत...
माराव्या मनसोक्त गप्पा..
डोकवावे भूतकाळात...
उघडूनी आठवणींचा कप्पा.. ||
खावे आईच्या हातचे...
स्वादिष्ट रूचकर अन्न...
बाबांच्या सहवासात...
घालवावा प्रत्येक क्षण ||
बाबा नि बहिणीसंगे...
करावी अंगतपंगत...
वाटावी सुखदुःखे...
सांगावी गंमत जंमत ||
मस्त निवांत उठावे...
नसावी काळजी कशाची...
घ्यावा मोकळा श्वास...
झुगारूनि बंधने वेळेची ||
जावे सख्यांन
ा भेटाया...
नि करावे हितगुज...
भटकावे त्यांसमवे...
करावी हौस नि मौज ||
रंगावे पत्त्यांचे डाव..
गावी मनसोक्त गाणी...
नि हसावे पोटभर...
डोळ्या दाटेपर्यंत पाणी |
माझ्या माहेरी माहेरी...
आप्त स्वकीयांचा मेळा...
रमेल हा जीव त्यात...
माझा भाबडा भोळा.. ||
जरी सासरी असतील...
मंडळी लावणारी जीव...
आईबापाच्या मायेसाठी...
मन घेते माहेरा धाव.. ||
पुरुषांना कसे उमजावे...
स्त्रीच्या अंतरीचे हे वर्म...
कळण्या महती माहेराची...
घ्यावा लागतो स्त्रीचा जन्म ||