माझे बाबा
माझे बाबा
जपे घराचे मांगल्य
अशी आदर्श ती आई
जळणाऱ्या ज्योतीपेक्षा
महत्त्वाची ती समई||१||
मुलांसाठी आहे असा
जणू अबोल सावली
भविष्यात जपणारी
बाबा अव्यक्त माऊली||२||
संसाराच्या मंदिराचा
बाप हा भक्कम पाया
घरासाठी मजबूत
स्थितप्रज्ञ अशी माया||३||
राबराबतो कष्टाने
आपल्याच पिलांसाठी
उन्हातान्हात फिरतो
सुखाच्या भाकरीसाठी||४||
डोंगरापरी महान
कणखर त्याचा कणा
काळजात संवेदना
असा स्वाभिमानी बाणा||५||
बाप पेटती मशाल
हाती कमाईची ढाल
त्याच्याच रे जीवावर
घर राहते खुशाल||६||
साठवतो नयनाश्रू
तळहाती पाकळ्यात
एकदाच तो रडतो
लेकीच्याच विरहात||७||
होते महान कर्तृत्व
माझ्या बाबांचे करारी
आज हृदयी प्रतिमा
आहे तशी मनांतरी||८||