।। कुंकू।।
।। कुंकू।।
1 min
28.6K
सौभाग्य तेज झळके कपाळी
कपाळी कुंकू रेखीते भाग्याला
आयुष्य लाभो धन्याला, मागते
मागते दान ,कृष्ण तुळशीला
कुंकवाखाली शोभते हळद
हळद भासे कणखर नार
संसाररथाची असे सारथी
सारथी ही सोबतीला किनार
कुंकवानं भरला भांग आई
आई तु महिषासुरमर्दिनी
ऊदो अंबे ऊदो गर्जती भक्त
भक्त श्रध्देची ही गजगामिनी
कुंकू ताकद कळली यमाला
यमाला फिरवले हो माघारी
कथा ही सत्यवान सावित्रीची
सावित्रीची जिद्द देते ऊभारी
कुंकवानं भरा ग मळवट
मळवट भाळी लेऊन गेली
सवाष्ण ही अहेव भाग्यवान
भाग्यवान देवाघरी चालली
कुंकवाचं तेज खुललं गाली
गाली आली लाली ,कळी खुलली
खुलली प्रीत सख्याच्या नयनी
नयनी लाज ,सखी बावरली
