व्यथा फुलांची
व्यथा फुलांची
मातीत गाडून घेताना...
आपल्याच शवावर सांडताना
ढसाढसा रडली फुलं...
कळीचे फुल होताना... यातनांची कसरत
त्यांनाही चुकली नव्हती...
रोपट्यापासून ते फांदीपर्यंत अन...
देठापासून ते फुलण्यापर्यंतचा प्रवास...
गर्भातल्या बाळाइतकाच खडतर...
जेव्हा कष्टाचं सार्थक होऊन निर्माल्य बनतं
आणि...
सुगंध पसरवून विसर्जित होतं...
तेव्हा जन्म पावन झाल्याचे समाधान लाभतं...
दुर्दैवाने आज बहरणं व्यर्थच ठरतंय...
भक्तीचा, श्रद्धेचा मानकरी असलेला...
पूजेतला पवित्र कळस... म्हणजे फुले
दगडातलं देवपण जागतं करणारी फुलं...
देऊळबंद म्हणून जाग्यावरच तिष्ठत उभी...
मंगल अष्टकांच्या पवित्र मंत्रोच्चारात... सहजीवनाची
सुरुवात तुझ्याच साक्षीने व स्पर्शाने होणारी...
सप्तपदीच्या वचनांचा तू साक्षीदार...
सत्कार असो की समारंभ तुझ्याशिवाय अधुराच...
प्रेमाची कबुली देताना मध्यस्थी करणारा तू
प्रामाणिक भाव...
शेवटच्या प्रवासात सरणावर सोबत फक्त तुझीच...
जळलेल्या देहा
च्या राखेला गंगेत तर्पण तुझ्याच पाकळ्यांचं...
देहाला मुक्ती अन आत्म्याची तृप्ती तुझ्या सहवासानेच मिळत असावी...
नव्हे मिळतेच...
तुझ्याशिवाय सगळेच प्रसंग अपूर्ण
आज तुझी व्यथा वेगळीच आहे...
ना कुणाच्या भक्तीत ना कुणाच्या मंगल प्रसंगात...
नाही कुणाच्या सत्कार समारंभात की...
नाही कुणाच्या अंत्ययात्रेची सोबत...
पावित्र्यातून सुरू होऊन... निर्माल्यांपाशी पोहोचणारा तुझा प्रवास जाग्यावरच थांबला...
पालनपोषण कर्त्याने हतबल होऊन मूठमाती दिली...
आणि नाईलाजाने जन्मदात्या धरतीन परोपकारी सुगंधी जीवाला पुन्हा उदरात सामावून घेतलं...
एक पिढी समर्पणावाचून वंचित राहिली...
जाग्यावर कोमेजली...
अशी फुलांची व्यथा झाली
...व्यथा झाली...
माणसाच्या जन्मापासून ते अंतापर्यंत...
प्रत्येक प्रसंगाची शोभा वाढवून...
मनाला सुगंधी अत्तर लावणाऱ्या फुलांनी...
स्वतःलाच श्रद्धांजली वाहिली...
पुन्हा कधीच न फुलण्यासाठी...
कधीच न फुलण्यासाठी...