जसा आहे तसाच बरा आहे
जसा आहे तसाच बरा आहे


नसेल मी परिपूर्ण म्हणून
का मी आज निराश व्हावे
निसर्गाने मला जसे पण
बनवले मी तसा बरा आहे
नसेल इतरांसारखे मला
मुखवटे चढवता आले
पण मी भलेही बिचारा
ठरलो तरी मी खरा आहे
नसेल होता आले मला त्या
आकाशातील चांदण्यांपैकी एक
पण कुणातरीसाठी मी नक्की
लाखातला एक तारा आहे
नसेल मी कुण्या एका
बागेतलं सुंदर फूल पण
मी तर सर्वदूर वाहणारा
सामर्थ्यवान वारा आहे
नसेल मी विशाल सागर
पण जीवनाच्या पठारावरुन
क्षणोक्षणी एक नवीन जन्म
घेणारा मी एक झरा आहे
का नेहमी दुसऱ्या कुणाशी
तुलना करता जगावं आता
वाटतं मी जसा पण आहे
हो मी तसाच बरा आहे...