जीवन त्याचे नाव
जीवन त्याचे नाव


पराभवाची चिंता सोडून मांड एकदा डाव
सुख-दुःखाचे येणे-जाणे जीवन त्याचे नाव।।धृ।।
दिवस सुखाचे येता आनंदाला येते भरती
सगे सोयरे गोळा होती त्वरित अवती भवती
गुळाभोवती मुंगळ्यासम जमा होतो जमाव।।१।।
मळभ दाटता डोईवरती जेव्हाही दुःखाचे
सोडूनी जावया शोधती मार्ग ज्याचे त्याचे
नाही काढत पुन्हा कोणी जवळ यायचे नाव।।२।।
जीवन म्हणजे जन्म-मृत्यूच्या मधले अंतर
पुन्हा नव्याने उद्या येतो दिवस रात्रीनंतर
वादळात डगमगू ना द्यावी जीवनाची नाव।।३।।
जन्म-मरण हे कधी कुणाच्या हाती नसते
मानवतेचा भाव ठेवुनी जगावयाचे असते
इथे जपावी नाती हृदयी भरुनिया प्रेम भाव।।४।।
इंद्रियांना सुख मिळते ज्यातून भोगून घ्यावे
सृष्टी सुंदर, जीवन सुंदर शतदा प्रेम करावे
उघड खजिना सौंदर्याचा नसे कुणा मज्जाव।।५।।
आयुष्याच्या सायंकाळी ध्यानी एक असावे
बाकी राहिले जे जे काही नित्य तया स्मरावे
स्मशानभूमी अंतिम अपुले मुक्कामाचे गाव।।६।।