गुरुकिल्ली
गुरुकिल्ली


प्रॉम्प्ट-१९ साठी
गुरुकिल्ली
एक घरटे सुंदर
पती पत्नी एक बाळ
दोघे मिळून बाळाचा
सुखे करती सांभाळ।।१।।
असे छोटा परिवार
सदा सुखी परिवार
गुरुकिल्ली ही सुखाची
जिथे एकीचा विचार।।२।।
जिथे फुटला विचार
एक घर दोन दार
दोघा हाती दोन किल्ल्या
कसा चालावा संसार।।३।।
नाही समर्पण भाव
नाही मायेचा ओलावा
अहंकार आड येतो
उभा राहतो दुरावा।।४।।
नाही मनात आदर
नाही प्रेमाचे वंगण
तडे भिंतीला जातात
होते भकास अंगण।।५।।
मन मारून जगणे
सदा चालते भांडण
एका क्षणात सरते
घरट्याचे घरपण।।६।।
नसो खायला प्यायला
प्रेम जिव्हाळा असावा
देवा, घरोघरी असा
सुखी संसार फुलावा।।७।।