बुद्धिबळाचा डाव
बुद्धिबळाचा डाव
हे जीवन, एक बुद्धिबळाचा डाव।।धृ।।
पट मांडला आयुष्याचा
खेळ चालला हा दैवाचा
क्षणात होतो रंक कुणी
तर क्षणात होतो राव।।१।।
राजा होऊन जरी बैसला
उंट, हत्तीची भीती तयाला
वेळ प्रसंगी प्यादे उलटती
घोडा, वजीर, करी उठाव।।२।।
कधी घेरती दुःखे जीवाला
जीवन मार्गी येई अडथळा
घालमेल मग होते जीवाची
ध्येय पथावर हो अटकाव।।३।।
सुखाचे तर नका विचारू
धावत सुटती मनाचे वारू
भुरळ पाडते असे मनाला
कसा करावा इथे बचाव।। ४।।
यशस्वीतेची ही गुरुकिल्ली
सर्वश्रेष्ठ बुद्धी नरा मिळाली
सुयोग्य वापर तिचा करुनि
साधून घ्यावा जीवन डाव।।५।।