हरवलेले बालपण
हरवलेले बालपण


रम्य बालपण सरून गेले,
उरल्या केवळ आठवणी।
मनमोकळे खेळायास्तव
आहे कुठे इतुके पाणी।।
सरिता, ओढे, कसे आटले
काळजातले प्रेम झरे।
कुणी कुणाचे उरले नाही
स्वार्थीच सारे हेच खरे।।
झाडे, वेली, निसर्ग सारा
उजाड झालेत माळराने।
थंड सावली कुठे राहिली
खेळावे कसे मुक्त पणे।।
बागे मधली फूल पाखरे
माहीत नाही गेली कुठे
किलबिलाट ना पक्षांचा
कोकिळेस ना कंठ फुटे।।
आट्यापाट्या, खोखो कुस्ती
लांब उडी अन् उंच उडी
मैदानी ते खेळ न उरले
गायब झाले हो सवंगडी।।
मोबाईलच्या खेळांमध्ये
लहान मोठे कसे गुंतले
मोबाईलचा गेम खेळता
घर कोंबडी होऊन बसले।।