हरवलेले माझे गाव
हरवलेले माझे गाव
हरवलेलं माझं गाव सापडेल का मला
त्या शेणाने सारवलेल्या भुईवर निजायला
मिळेल का मला.......ते हरवलेलं गाव.....।१।
ती ओट्यावरची गाण्यांची व गप्पांची मैफल
गोठ्यातील गाईचे हंबरणे, विहीरीवर हंडे घेऊन
निघालेल्या बायकांची गजबज
कधीतरी आता पहायला मिळेल का मला...।१। ते हरवलेलं...
चुलीच्या धुराबरोबर येणारा भाकरीचा गंध
आज ही चाळवतोय माझी पिझ्झाने भरलेल्या पोटाची भूक
पुन्हा कधी माझ्या गावतील चटणी भाकरीची चव
चाखायला मिळेल का मला......।२। ते हरवलेलं गाव....
ते बैलांच्या जोडीचे डौलदार चालणे
बैलगाडी
च्या चाकातून उमटणारे ते सप्तसूर
आलिशान लिमोझिन मध्ये ऐकायला मिळतील
का मला.....।३। ते हरवलेलं ...
कुंडाच्या मोडक्या भिंतींतही जपलेली
तटबंदीच्या बुरूजासारखी अनमोल नाती
हरवलीत शहरांच्या झगमगत्या गर्दीत
कुठे? कधी? केव्हा? गवसतील का मला ती
हरवलेली नाती पुन्हा...।४। ते हरवलेलं....
मी शोधतेय माझे हरवलेलं गाव
हृदयातील आठवणींच्या कप्प्यात
संध्याकाळच्या कातरवेळी उसवलेल्या माझ्या मनात
सापडेल का मला माझे हरवलेलं गाव …२ वेळा... पुन्हा
सापडेल का मला माझे हरवलेलं गाव पुन्हा......