हल्ली मला जाणवतंय
हल्ली मला जाणवतंय
हल्ली मला जाणवतंय..
काहीतरी वेगळंच घडतंय..
कंटाळवाण्या गर्दीत मी एकटाच असतो..
तुला आठवून हसतो..
एकटाच वेड्यासारखा!
हल्ली मला जाणवतंय..
मित्रांच्या जोक्सकडे लक्षच नसतं माझं,
एकटक नजरेने ढगात शोधत असतो काहीतरी..
आणि लिहीत बसतो बोटांनी
हवेतच आपल्या दोघांची नावं..
हल्ली मला जाणवतंय..
अर्थ नसतो माझ्या बोलण्याला
अन् विसरतो मधेच मी माझ्या चर्चेचा मुद्दा..
तरीही बोलत बसतो आणि
तुझ्याभोवतीच घुटमळतात माझे सगळे विषय..
हल्ली मला जाणवतंय..
ताई अन् बाबा उगीच हसतात मला पाहून..
अन् आई म्हणते कोपऱ्यात स्वत:शीच पुटपुटताना तिने मला पाहिलंय..
मला नाही कळत हे काय अन् का होतंय?
पण आरशातही हल्ली मला तूच दिसतेस माझ्या जागी..
हल्ली मला जाणवतंय..
लायब्ररीच्या फेऱ्या वाढल्यात माझ्या
अन् लेक्चरला मुद्दाम उशीरा येतो..
तू पहावे म्हणून वर्गात येतो ओलाचिंब होऊन,
पावसातही मुद्दाम छत्री घरी ठेवून..
हल्ली मला जाणवतंय..
अभ्यासाच्या वेळी हरवून जातो,
आजकाल तुला आठवून,
अन् खरडलेल्या निर्जीव शब्दांची मग,
अलगद कविता होते..
हल्ली मला जाणवतंय..
स्वप्नंदेखील माझी आता माझी राहिली नाहीत,
त्यांनाही कदाचित तुझा धाक असेल..
माझे मलाच नाही सुचत काही..
आहे का याचे उत्तर तुझ्याकडे..?
