घर माझे
घर माझे
नयन मनोहर, कौलारू घर रम्य किती दिसते।
लोभसवाणे, रूप देखणे कोण इथे उधळते।।१।।
अवती भवती गर्द सावली हिरव्या झाडांची।
वसुंधरा ही करते पखरण आपुल्या मायेची।।२।।
उंच उंच ते वृक्ष गवसणी घालतात गगनाला।
माझ्यासाठी जणू आणती स्वर्ग सौख्य माला।।३।।
हिरवे हिरवे गार गालिचे सभोवती कुणी पसरले।
हरित तृणांच्या पानावर जणू मोतीच ओघळले।।४।।
मऊ मऊ त्या गवतामधुनी पायवाट ही चालते।
घेत वळणे नागमोडी जणू नागीण सळसळते।।५।।
किलबिल किलबिल पक्षी गाती मंजुळशी गाणी।
जणू दयाळू भगवंताची करतात आळवणी।।६।।
घरास या उजळून काढण्या रविकिरणांची घाई।
हळूच त्यांना वाट करून देते इथली वनराई।।७।।
या घरट्याला सोबत करण्या झाडांवर बंगले।
पक्षांची घरटी जणू कोणी आकाशदिप टांगले।।८।।
नको कुणाची माडी, हवेली, नको कुणाचा बंगला।
निसर्गाच्या सान्निध्यातला राजवाडाच चांगला।।९।।
भरभरून इथे निसर्गाचे सौंदर्य असे खेळते।
अवीट गोडी स्वर्ग सुखाची मला इथे मिळते।।१०।।
