दुरावा माऊलीचा
दुरावा माऊलीचा


देवा कां रे असा दुरावा?
नाळ जोडीली जन्मापासुनी
ऋणानुबंधचे नाते जोडले
कां दूर केले तिच्यापासुनी.
सौजन्य गुण पेरले माझ्या अंगी
लेक लाडाची संस्कारी घडवुनी
चाली रिती भरल्या अंगवळणी
कां दूर केली मला एकटी टाकुनी?
आता रमले मी माझ्या संसारी गं
परी पदोपदी आठवण तुझी येते
अवती भवती तुझाच भास होतो गं
कां केला दुरावा देवास मी विचारते.
स्वप्नात तुझ्याशी रोज सादते संवाद
तेवढाच आधार वाटतो मनाला गं
सकाळ होताच स्वप्न वाटून निराशी मन
जीवनात तुझा दुरावा सहन होत नाही गं.
जगणे मरणे खेळ असे आयुष्याचे
प्रत्येकाचे भोग असतात ते नशिबाचे
वाटे सहवास लाभावा माऊलीचा सदा
पण दैव व नियतीपुढे न चाले ते कुणाचे.