चंद्रकोर...!
चंद्रकोर...!
लहानपणी गणेश चतुर्थीला
नेमकं आकाशात लक्ष जायचं
ती चंद्रकोर दिसायची आणि
मन घाबरं घाबरं व्हायचं
चोरीचा आळ यायचा
भीती वाटायची
आणि उतारा म्हणून
आम्ही घरावर दगड मारायचो
जसा दगड छप्परावर पडायचा
तशी आतूनच शिवी यायची
वाटायचं छप्परातला धुरच
तो बाहेर घेऊन यायचा
आज चन्द्रकोर दिसली
चांदणी, उपचांदणी दिसली
भय नाही वाटलं, छप्पराची जागा
आता टेरासने घेतली, सुटका झाली
आतवर कोठेतरी चोरी न करता
भय त्या काळी जाणवायचं
आता सर्व करून सावरूनसुद्धा
भयाच भय गेल्याचं नशीब पहायचं
आणि चांदणी मागच्या निळाईच
कौतुक उरात घेऊन घर गाठायचं
ती चंद्रकोर हसली की लाजली
तेही आता नाही पहायचं.
कारण जीवन असंच आहे
काळ मोठा जादूगार सारे, संदर्भ बदलतो
आणि प्रवाह पतित होऊन
जीवन जगायला शिकवतो
जीवन जगायला शिकवतो....
