STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

चिता रचू नको

चिता रचू नको

1 min
27.7K



जीवन जगता, लाख संकटे आल्यावरती खचू नको।

नैराश्याची मशाल हाती चिता आपली रचू नको।।धृ।।


सुखदुःखाचे येणे जाणे ऊन सावली समान रे।

धोपट मार्गी जगत असता प्रसंग येती भले बुरे।।

शक्ति प्रभूची असता पाठी भीती कसली धरू नको।।१।।


पत्नी, मुलगा, सखा, सोयरा खेळ असे हा स्वार्थाचा।

प्रसंग बाका तुजवर येता कोणी नसे तव कामाचा ।।

माझे माझे करत तयांचे ओझे ओढत बसू नको।।२।।


सांभाळाया तुला जयांनी हयात सारी घालवली।

माय पित्याला वाट आश्रमी कशास वेङ्या दाखवली।।

मार्ग तुलाही तोच मुलाने दाखवल्यावर रडू नको।।३।।


कोण, कुणाचा, कशास आला, ओळख अपुली करुन घे।

रोज झोपवी, उठवी, पचवी, कोण? तयाला स्मरुन घे।।

या विश्वाचा संचालक तो कधी तयाला विसरु नको।।४।।


मन, बुद्धी सह देह मानवी भगवंताने दिला तुला।

अध्यात्माचा, सत्संगाचा मार्ग भक्तिचा धरी भला।।

मानव असुनी पशू सारखे कधीच वर्तन करू नको।।५।।


ऋषी मुनींचे बोल अनुभवी जीवन जगणे सुकर करी।

विनम्रतेने जवळ बसूनी जीवन दृष्टी मिळव खरी।।

ऐक "पंडिता", सत्संगाविन कधी रिकामा असू नको।।६।।


Rate this content
Log in